फार्मसी विद्यार्थ्यांची औषधी वनस्पती उद्यानाला शैक्षणिक भेट; नैसर्गिक औषधांचे घेतले ज्ञान

IMG-20260210-WA0034.jpg

टेंभुर्णी, दि. 24 (प्रतिनिधी) अनिल जगताप पत्रकार टेंभुर्णी aj24taas News


टेंभुर्णी येथील एस. व्ही. एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (B.Pharm/D.Pharm) च्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच वसुंधरा औषधी उद्यान व वृक्ष संवर्धन, इंदापूर येथील औषधी वनस्पती उद्यानाला एक दिवसीय शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष वनस्पतींची ओळख करून देणे व त्यांच्या औषधी उपयोगांची माहिती मिळवून देणे हा होता.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उद्यानातील २०० हून अधिक प्रकारच्या दुर्मिळ व उपयुक्त औषधी वनस्पतींचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. यामध्ये प्रामुख्याने अडुळसा, कोरफड, अश्वगंधा, ब्राह्मी, तुळस, भुईआवळा, सर्पगंधा, नागकेशर व सप्तरंगी यांसारख्या वनस्पतींची माहिती देण्यात आली. तसेच या वनस्पतींची शास्त्रीय नावे (Botanical Names) व त्यांच्या औषधीय गुणधर्मांची सविस्तर माहिती वनस्पती तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

विद्यार्थ्यांनी वनस्पतींचे बाह्य स्वरूप, पाने, फुले, खोड व मुळे यांचा अभ्यास केला. हा अभ्यास त्यांना ‘फार्माकोग्नॉसी’ (Pharmacognosy) या विषयासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या विविध औषधांमधील घटकांची निर्मिती, प्रक्रिया तसेच गुणवत्ता नियंत्रण कसे केले जाते, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच हर्बल औषधनिर्मिती क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. ही शैक्षणिक भेट यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र ठोंबरे, कॉलेजचे प्राचार्य श्री. कृष्णात ढेकळे व डॉ. नेहा काजळे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रेणुका देशपांडे, प्रा. ऐश्वर्या सरवदे, प्रा. अभिषेक घागरे, प्रा. सृष्टी काळे, प्रा. भाग्यश्री घाडगे व प्रा. दिग्विजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.