भाजपच्या काळात राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर अन्याय? माढा तालुक्यात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

Screenshot_2026-04-05-17-16-55-96_7352322957d4404136654ef4adb64504.jpg

*aj 24taas news Maharashtra साठी टेंभुर्णी / प्रतिनिधी – हरीचंद्र गाडेकर सर मोबाईल नंबर -9921581001


टेंभुर्णी, ता. माढा – भाजपच्या सत्ताकाळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्याची चर्चा रंगत असतानाच, उजनी धरण व्यवस्थापन, भिमानगर येथील अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी केवळ अल्पसंख्याक असल्याने दुजाभाव करत शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप करत टेंभुर्णी येथील शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव शब्बीर बाबासाहेब जहागीरदार (वय ६९) यांनी दि. ७ एप्रिल रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्याने संपूर्ण माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या कारवाईला वैतागून त्यांनी हा टोकाचा इशारा दिला आहे.
लक्ष कुणाचे? उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांकडे सर्वांचे डोळे
या गंभीर प्रकरणाकडे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार लक्ष देणार का, याकडे संपूर्ण माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. “आज अजित पवार असते, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अशी वेळ आली नसती,” अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जहागीरदार यांच्या म्हणण्यानुसार, मौजे कंदर (ता. करमाळा) येथील गट क्रमांक ४१२/२ मधील त्यांच्या जमिनीवर दि. ८ जानेवारी २०२६ रोजी शाखा अधिकारी योगेश मोरे व उपविभागीय अभियंता नागेश जडे यांनी अतिक्रमणाचा ठपका ठेवत नोटीस बजावली. त्याच दिवशी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर दि. २३ फेब्रुवारी रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता पोकलेनच्या सहाय्याने उभे मका पीक नष्ट करण्यात आल्याचा आरोप असून, यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या प्रकरणात एकूण ६५ शेतकऱ्यांना केवळ नोटिसा देण्यात आल्या असून प्रत्यक्ष कारवाई मात्र फक्त जहागीरदार यांच्यावरच करण्यात आली आहे. यामागे राजकीय सुडापोटी त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे समजते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, दि. १७ मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट दि. २ एप्रिल रोजी पुन्हा उभ्या पिकांच्या विनाशाची नोटीस देण्यात आली असून दि. ७ एप्रिल रोजी कारवाई निश्चित करण्यात आली आहे. अत्यल्प कालावधीत नोटीस देऊन नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा भंग करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या सर्व प्रकारामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ होत असल्याचा दावा करत, “दि. ७ एप्रिल रोजीची कारवाई तात्काळ थांबवली नाही, तर त्याच दिवशी आत्मदहन करणार,” असा इशारा जहागीरदार यांनी प्रशासनाला दिला आहे.
या घटनेमुळे माढा तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.