डॉ. भगवंत पवार यांचे दैदीप्यमान यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी— डॉ. विठ्ठल लहाने

IMG-20260202-WA0054.jpg

*AJ 24taas news /अनिल जगताप पत्रकार टेंभुर्णी मोबाईल नंबर 9921581001*

वडशिवणे सारख्या छोट्याशा खेडेगावातून डॉ. भगवंत पवार यांनी मिळवलेले दैदीप्यमान यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले.

वडशिवणे येथे शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी डॉ. भगवंत पवार यांना शालेय जीवनात लाभलेल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

डॉ. भगवंत पवार यांचे प्राथमिक शिक्षण वडशिवणे येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण अजितदादा पवार विद्यालय, वडशिवणे येथे मराठी माध्यमातून पूर्ण झाले. अकरावी-बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण सोनवणे कॉलेज, उकडगाव येथे त्यांनी पूर्ण केले. नीट (NEET) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ७२० पैकी ६४५ गुण मिळवून त्यांनी एमबीबीएससाठी एम्स, हैदराबाद येथे प्रवेश मिळवला.

एमबीबीएस शिक्षणादरम्यान त्यांनी चार गोल्ड मेडल मिळवत टॉपर म्हणून यश संपादन केले. त्यानंतर एमडी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत देशात ६६८ वी रँक मिळवून हैदराबाद येथे एमडी शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. तसेच यूपीएससी सीएमएस परीक्षा देत देशात २५ व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. एका खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर समस्त ग्रामस्थांच्या वतीने डॉ. भगवंत पवार यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. संजीव सोनवणे होते.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील, प्राध्यापक संजय चौधरी, प्राचार्य ठोंबरे सर, उद्योजक सुनील शेठ कदम, प्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्रा. विशाल गरड, उद्योजक सोमनाथ खराडे, ह.भ.प. ढगे महाराज, गोमाता मंदिर केमचे गोसेवक श्री. परमेश्वर तळेकर, श्री. गोविंद जगदाळे सर, प्राचार्य पांचाळ सर, सुभाष पवार, भूषण शेठ लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. भगवंत पवार यांना शालेय जीवनात लाभलेल्या अंगणवाडी शिक्षिकांपासून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदाचा श्री विठ्ठलाची मूर्ती व भगवद्गीता भेट देऊन सन्मान करण्यात आला. या भावनिक क्षणाने उपस्थित सर्व गुरुजन अक्षरशः भारावून गेले होते.

कार्यक्रमास परिसरातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी मनोज राऊत, डॉ. खरात, गोविंद जगदाळे सर, प्रा. विशाल गरड, सोनवणे सर, चौधरी सर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेतर्फे डॉ. भगवंत पवार यांना ‘करमाळा भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. विठ्ठल लहाने यांच्या प्रेरणादायी व्याख्यानामुळे कार्यक्रमास विशेष शोभा आली.

आपल्या मनोगतात डॉ. भगवंत पवार यांनी सर्व गुरुजनांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ देवकर गुरुजी व श्री. नागनाथ मोरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गणेश पवार यांनी केले.