टेंभुर्णी (प्रतिनिधी) : धनंजय भोसले AJ 24taas news Maharashtra
**********************************
माढा तालुक्यातील वडोली येथे कै. नवनाथ नरहरी काळे (बीटू तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवारी दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी (आळंदी) यांचे कीर्तन होणार असून, गायनाचार्य ह.भ.प. ओंकार महाराज जगताप, संपत महाराज दानवे, मृदंगाचार्य आसाराम महाराज साबळे, ह.भ.प. तुकाराम महाराज पाटील (माळेगाव) तसेच कोंढार परिसरातील टाळकरी उपस्थित राहणार आहेत. या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी व पुण्यस्मरणानिमित्त पुष्प अर्पण करण्यासाठी वडोली व परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार सतीश काळे यांनी केले आहे.
कै. नवनाथ काळे यांनी उजनी पाटबंधारे विभाग, भीमानगर येथे ऑपरेटर म्हणून प्रदीर्घ काळ प्रामाणिक सेवा बजावली होती. ‘तात्या’ तसेच ‘बीटू तात्या’ या नावाने ते गावात परिचित होते. वडोली व परिसरात कुणाला कुत्रा चावल्यास किंवा पाय मुरगळल्यास बीटू तात्यांकडेच घेऊन जाण्याची प्रथा होती. त्यांच्या हातोटीमुळे अनेकांना त्वरित आराम मिळत असे. गावात कोणतेही दुःखद प्रसंग उद्भवल्यास ते सर्वप्रथम धावून जात आणि कुटुंबीयांना धीर देत पुढाकाराने अंत्यविधीची जबाबदारी पार पाडत असत.
बीटू तात्यांच्या निधनावेळी संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त केली होती. त्यांनी संसारही नेटका सांभाळला असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे लहान चिरंजीव सतीश काळे यांनी पत्रकारिता व बांधकाम क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.





