माळशिरस पंचायत समितीत लाचप्रकरणाला नवा ट्विस्ट बीडीओंसाठीही पाच हजारांची मागणी ?

Screenshot_2026-03-02-19-30-25-22_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

AJ 24taas news Maharashtra साठी पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस जाहिरातीसाठी संपर्क मो. 9921581001


माळशिरस : येथील माळशिरस पंचायत समिती मधील कथित लाचप्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. गटविकास अधिकारी (बीडीओ) पांढरे यांच्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आल्याचा उल्लेख फिर्यादीत झाल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरराव उत्तम नागटिळक यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत संबंधित व्यक्तीने स्वतःसाठी पाच हजार रुपये तसेच बीडीओ पांढरे यांच्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे नमूद केले आहे. या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत तपास यंत्रणा चौकशी करीत असून, दोषी आढळल्यास कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नसून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरविणे योग्य नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
सध्या पंचायत समितीवर प्रशासक कार्यरत असल्याने विविध विकासकामे, रोजगार हमी योजनेची बिले तसेच अहिल्यादेवी सिंचन विहिरींच्या बिलांवर सह्या करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च अखेरचा कालावधी सुरू असल्याने सर्वसामान्यांची बिले रखडू नयेत, यासाठी सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडे सह्यांचा कार्यभार सोपवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या असून लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे तालुक्यातील प्रशासन आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
तपासाअंती सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना, संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.