चारही बाजूंनी साखर कारखाने सुरू; करमाळ्यात आदिनाथ-मकाई मात्र कुलूपबंद!

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260103-WA0074.jpg

शेतकरी-कामगार उध्वस्त होत असताना पाटील गट फक्त राजकीय स्टंटमध्ये मग्न – ॲड. अजित विघ्ने यांचा थेट हल्ला

करमाळा प्रतिनिधी :अलिम शेख

*****************************
करमाळा तालुक्याच्या चारही बाजूंनी साखर कारखाने सुरू असताना तालुक्यातील आदिनाथ व मकाई हे दोन्ही सहकारी साखर कारखाने बंदच आहेत. परिणामी शेतकरी सभासद आणि कामगार देशोधडीला लागले असून, या ज्वलंत प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी सत्ताधारी पाटील गट केवळ राजकीय कुरघोड्यांत गुंतलेला आहे, अशी सणसणीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे कट्टर समर्थक ॲड. अजित विघ्ने यांनी केली. बेताल वक्तव्ये करून जनतेचे मनोरंजन करण्यापेक्षा पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी साखर कारखान्यांबाबत बोलावे, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

नुकत्याच पार पडलेल्या करमाळा नगरपरिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची चर्चा रंगू लागली असून, त्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांमध्ये आढावा बैठका घेत कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली आहे. या घडामोडींमुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरल्याचा आरोपही विघ्ने यांनी केला.

याच पार्श्वभूमीवर आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी खांबेवाडी येथील कार्यक्रमात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर विकासकामांबाबत टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना ॲड. विघ्ने म्हणाले की, निवडणुका लागल्या की पाटील गटाच्या प्रवक्त्यांना बेताल वक्तव्ये करण्याची सवयच आहे. जय-पराजय होतच राहतात; मात्र जनतेला भाषण नव्हे तर काम दिसते.

माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना करमाळा तालुक्यासाठी कोट्यवधींचा विशेष निधी आणला. त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळात विकासकामे प्रत्यक्षात दिसू लागली आणि शिंदे गटाचा मतांचा टक्का सातत्याने वाढत गेला, असा दावा विघ्ने यांनी केला. उलट निवडणुका जिंकूनही सत्ताधाऱ्यांना करमाळ्यासाठी एक रुपयाचाही ठोस निधी आणता आलेला नाही. आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक जिंकूनही शेतकरी सभासदांना दिलेली आश्वासने आजही हवेतच असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रवक्ते तळेकर पेन ड्राइव्ह, धमाका, अणुबॉम्ब अशा शब्दप्रयोगांनी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा ‘पराभवाची हॅट्रीक’ होईल, असे भाकीत करणाऱ्यांनी आमदार नारायण आबा पाटील आमदार होण्यापूर्वी किती वेळा पराभूत झाले आणि २०१९ मध्येही कसा पराभव पत्करावा लागला, याचाही हिशेब मांडावा, असा टोला विघ्ने यांनी लगावला.

विधानसभा व आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकांत अभद्र युती करून विजय मिळवण्यात आला, तरीही तीन-चार गट एकत्र येऊनसुद्धा माजी आमदार संजयमामा शिंदे यांना तब्बल ४३ टक्के मतदान मिळाले, हे वास्तव लपवता येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे करमाळ्याचा खरा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट झाले आहे, असा दावाही त्यांनी केला.

करमाळा नगरपरिषद निवडणुकीत पाटील गटाने नेमके कुणासाठी काम केले, याचा तथाकथित ‘पेन ड्राइव्ह’ लवकरच जनतेसमोर येईल, असा इशारा देत सावंत गटाची नगरपरिषदेत झालेली एन्ट्री ही करमाळ्याच्या राजकारणात नव्या गटाची नांदी ठरेल, असेही विघ्ने म्हणाले.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत मागील पराभव भरून काढण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सर्व नेते-कार्यकर्ते सज्ज असून, अनेक नवे चेहरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत आमच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास ॲड. विघ्ने यांनी व्यक्त केला.

शेवटी, पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी विकासकामांचा व आदिनाथ साखर कारखाना कसा सुरू करणार, याबाबतचा ‘पेन ड्राइव्ह’ खिशात ठेवून आधी प्रत्यक्ष काम करून दाखवावे. करमाळ्याची जनता भोळी नाही; निवडणूक जिंकवणारी हीच जनता आता निकाल मागत आहे. तो निकाल न दिल्यास आगामी निवडणुकांचा खरा रिझल्ट पाहावा लागेल, असा थेट इशारा ॲड. अजित विघ्ने यांनी दिला.