सुरज चौगुले यांची भारतीय शूटिंग व्हॉलीबॉल संघात निवडमाढा तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात अभिमानाचा क्षण

Click Here
Picture of aj24taa News

aj24taa News

संपादक:-अनिल जगताप
संपर्क क्र:- 9921581001

IMG-20260130-WA0024.jpg

टेंभुर्णी | प्रतिनिधी अनिल जगताप पत्रकार टेंभुर्णी मोबाईल नंबर 9921581001

-*******************************-****

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील होतकरू आणि गुणवान खेळाडू सुरज राजू चौगुले यांची आगामी शूटिंग व्हॉलीबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने माढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने टेंभुर्णी गावाच्या क्रीडाक्षेत्राच्या इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला जात आहे.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत पार पडलेल्या राष्ट्रीय व आंतरराज्यीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये सुरज चौगुले यांनी सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळाचे दर्शन घडवत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. महत्त्वाच्या सामन्यांतील निर्णायक कामगिरी, चपळ हालचाली आणि संघभावना यामुळे तो निवड प्रक्रियेत अव्वल ठरला.
दिल्ली येथील जे.एन. स्टेडियमवर १ ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या जागतिक स्तरावरील शूटिंग व्हॉलीबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सुरज भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत जगातील विविध देशांचे नामांकित संघ सहभागी होणार असून, भारतीय संघाकडून सुरजकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या ऐतिहासिक निवडीबद्दल श्री माऊली शिक्षण संस्था संचालित सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते सुरज चौगुले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडाप्रेमी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच तरुण खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सुरजचे अभिनंदन केले.
आपल्या यशाबद्दल बोलताना सुरज चौगुले यांनी, “हे यश माझ्या आई-वडील, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच मिळाले आहे. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन,” अशी भावना व्यक्त केली.
सुरजच्या क्रीडा प्रवासात महाराष्ट्र संघाचे कर्णधार रोहिदास वाघमारे तसेच अप्पा कसबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाल्याचे सुरजने सांगितले.
सुरज चौगुले यांच्या या निवडीमुळे माढा तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडाक्षेत्रात करिअर घडविण्यास नवी दिशा व प्रेरणा मिळाली असून, भविष्यात या भागातून आणखी खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकतील, अशी आशा व्यक्त होत आहे.