टेंभुर्णीaj24taas news Maharashtra
बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व त्यांच्या सहयोगी संघटनांच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे माढा लोकसभा अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनी दिली आहे. या मोर्चासाठी माढा लोकसभेतून सुमारे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची जातीनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, ईव्हीएम यंत्रणा बंद करून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवावी, तसेच वारंवार महापुरुषांचा अवमान थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे.
संविधानाचे रक्षण, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी हे आंदोलन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशात हिंदू-मुस्लिम, सवर्ण-दलित, ओबीसी आदी समाजघटकांमध्ये तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून, अशा जातीवादी प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी हा महामोर्चा काढला जात आहे. तसेच, बामसेफचे अधिवेशन कटक (ओडिशा) येथे घेण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या असतानाही त्या रद्द करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सदर महामोर्चा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून, देशभरातून मोठ्या लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणाबाबत केंद्र किंवा राज्य शासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही परंतु आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





