AJ 24taas news Maharashtra साठी टेंभुर्णी प्रतिनिधी धनंजय भोसले
मोबाईल नंबर 9921581001
शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त राजमुद्रा प्रतिष्ठान, वडशिवणे यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, निबंध व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत अकोले खुर्द (ता. माढा) येथील बबनराव शिंदे विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत विद्यालयाचा लौकिक उंचावला. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात (इ. ९ वी ते १२ वी) स्वराली घाडगे हिने प्रथम, संस्कृती मोरे हिने द्वितीय तर श्रेया देवकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. मध्यम गटात (इ. ६ वी ते ८ वी) धनलक्ष्मी नलवडे हिने प्रथम, ज्ञानेश्वरी डोके हिने द्वितीय तर आदित्य नलवडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. लहान गटात (इ. १ ली ते ५ वी) श्रावणी श्रीराम हिने प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
हस्ताक्षर स्पर्धेत अनुष्का मोरे हिने प्रथम तर ऋतुजा लेंडे हिने द्वितीय क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धेसाठी लहान गटासाठी ‘माझी आई’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘सावित्रीबाई फुले’, ‘आदर्श माता जिजाऊ’ हे विषय देण्यात आले होते. मध्यम गटासाठी ‘माझे वडील’, ‘आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘संघर्ष परिस्थितीशी’ तर मोठ्या गटासाठी ‘राजे पुन्हा जन्माला या’, ‘गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी’ आणि ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ हे विषय ठेवण्यात आले होते. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी लहान गटास राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’, मध्यम गटास भारताच्या संविधानाची प्रस्तावना तर मोठ्या गटास ‘पसायदान’ हा उतारा देण्यात आला होता.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सुहास कोडलिंगे, सचिव रेवण टकले, उत्सव समिती प्रमुख पृथ्वीराज चव्हाण, उपाध्यक्ष हनुमंत माने, खजिनदार लक्ष्मण माने तसेच मंडळाचे सभासद यांनी परिश्रम घेतले. पर्यवेक्षक म्हणून साईनाथ देवकर, नागनाथ मोरे, रमेश कोडलिंगे व भैरवनाथ उघडे यांनी काम पाहिले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे अकोले खुर्द व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





