AJ 24taas news Maharashtra/साठी प्रतिनिधी धनंजय भोसले टेंभुर्णी
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा फुले विद्यालय वरवडे, ता. माढा परितेवाडी येथील देवयणी लहु पवार हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेत तिने १७९ पैकी १४० गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.
एन.एम.एम.एस. ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. या परीक्षेमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी व शैक्षणिक प्रगती चाचणी या दोन घटकांचा समावेश असतो. या दोन्ही घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देवयानी ने आपले स्थान निश्चित केले आहे.
या परीक्षेत देवयानी लहू पवार हिने १४० गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, माजी आमदार यांचे पुत्र ॲड.बाळासाहेब पाटील यांच्याकडून सन्मान करण्यात आला. देवयानी ही रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले विद्यालय वरवडे येथील विद्यार्थिनी असून ती अभ्यासात सातत्य, जिद्द आणि शिस्तबद्ध नियोजनासाठी ओळखली जाते. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच तिने अतिरिक्त सराव, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन यावर भर दिला. तिच्या या यशामागे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक के.बी. होडगर यांचे लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी,डॉ.अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, विभागीय चेअरमन संजीव पाटील, उच्च माध्यमिकचे सहसचिव एस.जी. मेनकुदळे, माध्यमिकचे सहसचिव बी. एन. पवार, विभागीय अधिकारी जगदाळे, उपविभागीय अधिकारी दाभाडे, निकम, रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य, शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब पाटील व इतर सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवक वृंद व आजी – माजी विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ,पालक यांनी अभिनंदन केले.





