टेंभुर्णी प्रतिनिधी /हरिश्चंद्र गाडेकर सर
*********************************
माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे शेतीवर मोठे संकट ओढावले असून, द्राक्ष, केळी, डाळिंब, कांदा, खरबूज यांसह फळबागा व पालेभाज्यांची पिके मोठ्या प्रमाणावर जळून गेल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत.
खते वापरल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण प्लॉट नष्ट होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे आतापर्यंत अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात सदर प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करून संशयित खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, तसेच दोषी खत उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्वरित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तात्काळ व ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना औदुंबर (भाऊ) देशमुख (माजी अध्यक्ष, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस श.प.), विशाल मस्के, नवनाथ महाडिक व गणेश खुळे उपस्थित होते.





