करमाळा/प्रतिनिधी अलीम शेख
आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या स्पष्ट आदेशानुसार येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये करमाळा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर व स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची ठाम घोषणा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अमोल जगदाळे यांनी केली.
करमाळा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकरी, कष्टकरी, वंचित, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर, ऊस दरवाढ, शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी यांसाठी रस्ता रोको, ठिय्या आंदोलन, शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरले आहे.
तसेच तालुक्यात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रहारने जनतेच्या अडचणींना थेट हात घातला आहे. दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी लढणारी आणि न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून प्रहारची ओळख आहे. जात–धर्माच्या भिंती तोडून सर्व समाजघटकांना न्याय देणे हीच प्रहारची भूमिका असल्याचे अमोल जगदाळे यांनी स्पष्ट केले.
करमाळा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाची मजबूत संघटनात्मक बांधणी असून तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांच्याकडे सर्व बी-फॉर्म अधिकृतपणे रवाना करण्यात आले आहेत. चळवळीत झटणाऱ्या, संघर्षातून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देऊन संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाची सुमारे १५,००० मतांची ताकद असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही ताकद जनतेसमोर ठामपणे दाखवून दिली जाईल, असा विश्वास अमोल जगदाळे यांनी व्यक्त केला.
करमाळा तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला, वंचित, दिव्यांग व परिवर्तनाची इच्छा असलेल्या सर्व नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्वबळाच्या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






