टेंभुर्णी / प्रतिनिधी AJ 24taas news
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या दोन्ही युनिटमधील 21 ते 31 जानेवारी या दहा दिवसांचे ऊस बील प्रति टन 3025 रुपये प्रमाणे पहिला हप्ता सभासद व ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती देताना मा.आ. शिंदे म्हणाले की, कारखान्याचा सन 2025-26 चा गाळप हंगाम जोमाने सुरू असून युनिट नं.1 पिंपळनेर येथे दररोज सरासरी 14,700 मे.टन तर युनिट नं.2 करकंब येथे दररोज 5,000 मे.टनपेक्षा जास्त गाळप होत आहे.
कारखान्याने आजअखेर युनिट नं.1 कडे 14,52,484 मे.टन तर युनिट नं.2 कडे 5,01,921 मे.टन असे एकूण 19,54,405 मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे.
दरम्यान, 21 ते 31 जानेवारी या दहा दिवसांच्या ऊस बिलासाठी 61 कोटी 50 लाख रुपये अदा करण्यात आले असून 31 जानेवारी अखेर एकूण 544 कोटी 21 लाख रुपयांचे ऊस बील सभासद व ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले असल्याचेही मा.आ. शिंदे यांनी सांगितले.
गाळप हंगामातील उद्दिष्टपूर्तीसाठी सभासद व ऊस पुरवठादारांनी त्यांचा संपूर्ण ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मा.आ. बबनराव शिंदे यांनी केले.





