पिलीवच्या साठेनगरला पाणीप्रश्नातून दिलासा
पिलीव प्रतिनिधी (प्रमोद भैस)
माळशिरस तालुक्यात विकासकामांची गती पुन्हा एकदा अधोरेखित करत, पिलीव येथील साठेनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर निर्णायक तोडगा निघाला आहे. साठेनगर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा टाकीचे भूमीपूजन माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
साठेनगर परिसरात असलेली जुनी दगडी पाण्याची टाकी पूर्णतः जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणावर गळती सुरू होती. परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ही गंभीर बाब साठेनगर येथील नागरिकांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, अवघ्या एकाच महिन्यात या पाणीटाकीसाठी निधी मंजूर करून विकासकामाला गती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून, सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामासाठी माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष नितीन मोहीते व माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला.
या भूमीपूजन प्रसंगी माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहीते, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, मळोलीचे चंद्रकांत जाधव, जिल्हाध्यक्ष शिवराज पूकळे, पिलीव शहराध्यक्ष प्रमोद भैस, प्रवीण वाघमारे, डॉ. निलेश कांबळे, अंकुश भैस, गणेश देशमुख, आबा बनसोडे, सदाशिव लोखंडे, कुमार लोखंडे, राजू लोखंडे, दिलीप लोखंडे, महादेव जरग, संतोष करडे, सूरज वाघमारे, संतोष झेंडे, दादा सातपुते, बापू लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :
या नवीन पाणीपुरवठा टाकीमुळे साठेनगर व पंचशीलनगर परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.





